Sunday, January 24, 2021

आई होणे - एक सुंदर प्रवास 

 आई होणे हा आनंदाचा परमोच्च क्षण असतो आणि तो शब्दांमध्ये मांडणं खरंच अवघड आहे... पण तरीही माझा आई होण्याचा प्रवास शब्दबद्ध करून ठेवावा म्हणून हा खटाटोप! 




Pregnancy चा काळ 

Finally आम्ही ठरवलं की आता बाळ हवंय... डॉक्टरच्या visits, आमचे प्रयत्न चालूच होते त्यामुळेच मी प्रेग्नन्ट झाले तेव्हा माझे मलाच कळलं होते(sixth sense जो प्रत्येक आईला असतो) जे काही दिवसांनी ब्लड टेस्ट ने confirm झालं...     
वैद्य आणि फडके दोन्ही कुटुंब ही बातमी ऐकून आनंदाने बहरून गेली.  माझा बंगलोर स्थित भाऊ तर इतका excite झाला की फोन मधूनच इथे येतोय की  काय असं वाटलं त्याच्याशी बोलल्यावर! 

पहिले बाळ असल्याने डिलिव्हरी मुंबईला करायची हे आमचं आधीच ठरलं होते Throughout pregnancy आमच्या गुणी लेकीने मला काहीच त्रास दिला नाही... उलट्यांचा त्रास पण मला फक्त १५ दिवस झाला..... डोहाळे गोडाचे लागले...मला generally गोड आवडत नाही.... माझा मलाच विश्वास बसत नाहीये आता कि मी अर्धा किलो श्रीखंड एकटीने खाल्लं होते, ice cream चा मोठा डबा एकटीने एका बैठकीत संपवला!! Monthly  gynac check  ups, calcium, iron च्या गोळ्या, जिने चढता उतरताना योग्य काळजी असं सगळे नीट चालू होते... भारतात स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण खूप असल्याने गर्भ लिंग निदान बेकायदेशीर आहे, पण इथे तसं काही नाही म्हणून डॉक्टर आधीच सांगतात मुलगा आहे की मुलगी... आमच्या डॉक्टरने विचारले होते आम्हाला जाणून घ्यायचं आहे का मुलगा आहे की मुलगी ते. पण आम्हालाच आधी माहीत करून घ्यायचे नव्हतं..      

हळूहळू घरकाम करणे जड जायला लागलं... मग बाईचा शोध सुरु झाला.... २-३ बायांना call केले पण माझ्या वेळेला म्हणजे संध्याकाळी ७-७.३० ला यायला कोणीच तयार नाही. एका बाईला बाबा-पुता करून तयार केले ...ती एक दिवस आली...दुसऱ्या दिवशी गायब!... विचारलं तर म्हणते ...madam मला तुमच्या घरासमोरचा रस्ता क्रॉस करायला भीती वाटते!!! हे काय कारण असू शकते! शेवटी एका male maid ला ठेवले केर लादी आणि भांड्याना...      

 बघता बघता ७ महिने झाले आणि मुंबईला जायची वेळ आली.. इतके दिवस डॉ.  गीतांजली शाह यांच्या गर्भसंस्कार app मधल्या गोष्टी मी week by week follow करत होते... ८ सप्टेंबर २०१६ ला मुंबई ला आलो. आल्या आल्या १८ च्या रविवारी मी आणि किरणने डॉ गीतांजली यांचा गर्भसंस्कार क्रॅश कोर्स केला..... ज्यामुळे मला खूपच फायदा झाला. आल्यावर डॉ विक्रम शाह यांना दाखवलं आणि त्यांनी सांगितलं expected date २५ ऑक्टोबर असली तरी ९० टक्के तुमची डिलिव्हरी आधीच होईल. माझा जीव भांड्यात पडला...कारण २५ नंतर डॉक्टर स्वतः दिवाळीच्या सुटीवर जाणार होते एक आठवडा! चेक अप नंतर लक्षात आले की हिमोग्लोबिन निदान ११ तरी असायला हवं या स्टेजला...जे माझं ९. ८ होतं . डिलिव्हरीच्या वेळी २ पॉईंट्स हिमोग्लोबिन बाळ घेतं. जर कमी असेल हिमोग्लोबिन तर रक्त चढवायची वेळ पण येऊ शकते!! म्हणून डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार रोज एक अशी ४-५ injections घेतली. ऐश्वर्याची ad पाहून curiocity ने चौकशी केली Stem cell banking ची आणि पटलं म्हणून Lifecell चं package घेतलं. त्यांनी दिलेले kit घेऊन जायचं हॉस्पिटल ला आणि Labour pain सुरु झाल्यावर त्यांना कळवायचे की त्यांचा representative येतो लगेच. 


आल्यावर फीडिंग गाउन, बाळाचा बेड, २ सेट बाळाचे कपडे, diapers, हिमालया बेबी क्रीम असं सगळं घेऊन झालं...बाकी तयारी पण हळूहळू चालू होती... आईने मालिशवाली बाई पण fix केली लगेच...बाळांच्या नावाच्या २ lists बनायला लागल्या..... मुलींची नावं आणि मुलांची नावं .... रोजचं अर्धा पाऊण तास चालणे,रामरक्षा ऐकणे , गाणी ऐकणे , व्यायाम, आरामात पुस्तके वाचणे आणि आईच्या हातचे सुग्रास जेवण....अजून काय पाहिजे..... मज्जानु life....       

मी आले तेव्हा ८ वा महिना चालू होता आणि मग पितृपक्ष...त्यामुळे डोहाळजेवण करता आलं नव्हतं म्हणून ९ वा लागल्यावर सगळ्यांची सोय पाहून घरच्या घरी  शनिवार ८ ऑक्टोबर २०१६ ला डोहाळ जेवणाचा बेत आई बाबानी आखला. सगळ्यांना कळवलं. फुलांची आणि फुलांच्या दागिन्यांची ऑर्डर देऊन झाली... मेनू ठरला.... पण ..... पण आमच्या लेकीला जामच घाई झाली होती आमच्यात यायची! 

आई पद बहाल झालं तो दिवस 

 
५ ऑक्टोबर ला रात्री मी toilet ला जायला उठलेच नाही.. ६ तारखेला सकाळी ७ वाजता toilet ला गेले आणि बघते तर bleeding झालेलं!! लगेच आई आणि मी निघालो डॉक्टर ना दाखवून येऊया म्हणून.... आई बाबा टॅक्सी मागवण्याचा लगबगीला लागले... तेव्हा मीच म्हटले की "कशाला उगाच टॅक्सी.... मला काही होत नाहीये....  नुसतं दाखवून यायचंय डॉक्टरांना" बाबांना बाहेर काम होतं... त्यांनाही म्हटलं जाऊन या तुम्ही आम्ही दाखवून येऊ लगेच... चालत चालतच गेलो हॉस्पिटल मध्ये.. ८ वाजता पोचलो. डॉक्टर पूर्णिमा आल्या आणि त्यांनी मला आतून तपासलं... त्यांनी सांगितलं की गर्भाशयाचं तोंड उघडायला सुरुवात झालीये. आपण काही वेळ मॉनिटर करूया ३-४ तास... प्रत्येक केस वेगळी असते..काहींचं गर्भाशय लगेच अजून उघडायला लागतं तर काहींचं काही दिवसांनी उघडतं. 

एका कॉट वर मी बसले. पेपर वाचला. जरा झोप काढली. मग नवरोबाला - किरणला कॉल केला आणि सांगितलं की असं असं  दवाखान्यात आहे...थोड्या वेळाने सोडतील कदाचित....आई म्हणाली अगं सकाळी असेच आलो आपण गडबडीने...मी घरी जाऊन पटकन ब्रेकफास्ट बनवून आणते तुझ्याकरता...भूक लागली असेल ना... मी म्हटलं चालेल..आण... आईने मस्त शेवयांचा उपमा करून आणला...मी छान चापून खाल्ला...त्यानंतर मात्र मला बेड वर झोपता येईना...मी पडले रे पडले की प्रचंड "uneasy" वाटायला लागायचं. थोडा वेळ हा प्रकार चालला. मी येरझाऱ्या घालू लागले तिथल्या तिथे आणि आई मला धीर देत होती. नंतर मला संडासला जावेसे वाटू लागलं. आईचा हात धरून ३-४ वेळा खेपा घालून आले...पण उपयोग शून्य! आता मात्र मला धीर धरवेना... मी डॉक्टरना बोलवा असा हट्ट केला आणि पूर्णिमा डॉक्टर ना सांगितलं की आता पुरे ... मला गोळी द्या एखादी संडासला होईल अशी.... मला हा प्रकार नाही सहन होत आहे. त्या पटकन आल्या आणि त्यांनी गर्भाशय परत तपासले आणि लगबगीने हालचाली सुरु केल्या. मला मात्रं काय करू म्हणजे बरं  वाटेल हे कळेना.... आईला सोबत घेऊन toilet ला गेले. जरासा जोर करू लागले... तेवढ्यात अश्विनी हॉस्पिटलच्या मावशी आल्या आणि खेचतच मला बाहेर आणले.... म्हणाल्या " जरा कळ काढ की पोरी! इथेच होईल बाळ नाहीतर!" आई अनुभवी असली तरी तिला माझी तगमग पाहवेना आणि काय करावे कळेना... 
पूर्णिमा डॉक्टर आल्या आणि त्यांनी सांगितलं की डिलिव्हरी आहे तुझी आता .... अरे बापरे! झाली ना पंचाईत! असं काही होईल असं वाटलंच नव्हते... चेक-अप झाला की घरी येऊ लगेच म्हणून असेच आलो होतो आम्ही....हात हलवत ....  Lifecell चं kit तर घरीच राहिलं होतं... आई जाऊ शकत नव्हती मला सोडून आणि बाबाही बाहेर होते.... आई ने बाबांना कॉल केला आणि लवकर यायला सांगितलं. नशिबाने Dr. शाह यांच्याकडे Lifecell चं दुसरे kit होते. ते म्हणाले तू कॉल कर त्यांना या लगेच म्हणून. माझ्याकडचे kit वापरू आपण... नंतर तू तुझं kit आणून replace कर. 

मला झोपायला सांगितलं आणि कसलंसं injection दिलं आणि मग movie मध्ये होते तसं सगळं धूसर झालं ..... बहुदा मला operation theatre मध्ये नेलं असावं.... मी अर्धवट ग्लानी मध्ये होते... मधेच डॉक्टर्स चे बोलणे ऐकू येत होते - ते माझ्याशी बोलतायत की एकमेकांशी हेही नीट कळत नव्हते.... थोडक्यात माझी "मैं कहाँ हूँ ?" स्थिती झाली होती .... तेवढ्यात "push कर , come on ..push ..one last push" कानावर पडलं आणि हे मलाच सांगितलंय हे ध्यानात आलं आणि सगळा जोर काढून केलं push ! मी पूर्ण थकले होते पण माझे कान आसुसले होते ऐकायला की बाळ छान सुखरूप आहे...." Congratulations संजीवनी ! तुम्हाला मुलगी झालीये आणि छान आहे ती !" मोठ्या प्रयत्नानं मी डोळे उघडे ठेवले होते आणि ते शब्दं ऐकून मात्र तृप्तं मनाने डोळे मिटले. माझ्या लेकीला इतकी घाई होती यायची की माझे  बाबा गिरगावहून टॅक्सीने  यायच्या आत  ही आली की बाहेर! ते सुद्धा मला अजिबात त्रास न होता! काही बायका २४-२५ तास प्रसव वेदना सहन करतात!! 
माझ्या आईने आमच्या लाडूबाईला  सर्वात पहिल्यांदा उचललं आणि तिच्या कानात गायत्री मंत्र म्हटला....