विमान प्रवास बंद झाला तर.....
आज आपण सगळेच global citizens झालो आहोत. आज काही गोष्टी आपल्या इतक्या अंगवळणी पडल्या आहेत की कधी काळी आपण त्याशिवाय सुद्धा अगदी व्यवस्थित जगू शकत होतो हे सहज आठवतच नाही आपल्याला! Mobile phone, विमान प्रवास या सगळ्या गोष्टी यातच मोडतात. मला आजही स्पष्टं आठवतायत बाल्कनी मध्ये येरझाऱ्या घालत माझ्या बाबांची वाट पाहणारे "no mobile era " मधले माझे आजोबा....
विमान प्रवासामुळे खऱ्या अर्थाने जग जवळ आलंय. प्रवासामुळे आलेल्या विविध अनुभवांमुळे आज आपण अधिक समृध्द झालोय असं म्हटलं तर वावगं ठरू नये... आज कोरोना व्हायरसमुळे सगळं जग थांबलंय , ठप्प झालंय.... सगळ्यांचा विमान प्रवासच नव्हे तर प्रवासच बंद झालाय....अशा वेळी हा विचार मनात आला की आता जर विमान प्रवासच बंद झाला तर काय होईल ? कल्पनेनेच मनात धस्सं झालं. रावापासून रंकापर्यंत सगळ्यांवरच याचा परिणाम दिसेल.
वैयक्तिक दृष्टीने म्हणाल तर आमचं "मधू इथे आणि चंद्र तिथे झुरतो अंधारात" चालूच राहील...... (मी मुंबईला आणि नवरोबा मस्कतला ) दुसरं म्हणजे आमच्या पोटावरच पाय येईल!... कारण माझा नवरा aviation industry मध्ये काम करत असल्याने त्याला परत शून्यापासून काहीतरी सुरु करावे लागेल. आणि फक्तं माझा नवराच नाही तर लाखो लोकांच्या रोजी रोटीवर डायरेक्ट परिणाम होईल. Pilots, Cabin crews , Airport ground staff, Dispatchers, Air Traffic Controllers, Aviation Experts, Air Cargo Segment Industry मध्ये काम करणारे लोकं - सगळ्यांनाच काहीतरी वेगळं career शोधावं लागेल, जे कदाचित अतिशय अवघड आणि आव्हानात्मक असेल. आपण काही आकडेवारी पाहूया या क्षेत्राची एकूण व्याप्ती लक्षात येण्याकरता. IATA ने प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार २०१० मध्ये ७.९ करोड लोकांनी भारतात, भारतामधून किंवा भारताअंतर्गत प्रवास केला. २०१७ पर्यंत हा आकडा दुप्पट झाला आणि १५. ८ करोड झाला. हवाई दळणवळणाचा भारतीय अर्थव्यवस्थेत सिंहाचा वाटा आहे. भारतीय Aviation sector ७५ लाख लोकांना पोसतो. जवळपास ४ लाख डायरेक्ट रोजगार , साधारण ६ लाख रोजगार संलग्न क्षेत्रांमध्ये आणि ६२ लाख रोजगार Tourism क्षेत्रामध्ये.
सर्वाधिक फटका कोणाला बसणार असेल तर तो आहे Tourism Industry ला ! "Best of Europe", "Jewels of Spain", "Norway in a nutshell" , "Ultimate USA " अशा सगळ्या टूर्स चक्कं गायब होतील ना ! अर्थात बोटीने प्रवास करण्याचा मार्ग खुला असेल, पण "Foreign Tour"चं सगळ्यांचं planning कोलमडेल. आपापल्या देशात बस आणि ट्रेनने प्रवास करण्यासारख्या ठिकाणीच सुट्टी घालवता येईल. पर्यायाने इथेही लाखो लोकांच्या नोकरीवर गदा येईल. IT companies, Import-Export companies च्या कामावरही मोठा नकारात्मक परिणाम दिसून येईल. प्रादेशिक ऑफिसेस असलेल्या कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या प्रवासाची वेगळी सोय करावी लागेल, म्हणजेच जास्त वेळ दवडावा लागेल प्रवासात.... Foreign investments वर पण लक्षणीय परिणाम दिसून येईल. मागील काही वर्षात "Medical tourism"ने आपले हातपाय पसरले आहेत. त्यावरही गंभीर नकारात्मक परिणाम दिसून येतील.
बऱ्याच जणांना कदाचित माहिती असेल की प्रत्येक देश दुसऱ्या देशाच्या airline ला आपले हवाई क्षेत्रं वापरण्याबद्दल काही शुल्क आकारतो. ठराविक सेवा कर, पार केलेले अंतर आणि विमानाचे वजन या सगळ्या बाबींवर हे शुल्क अवलंबून असते. तुम्हीच कल्पना करा या शुल्काची. या Airbus किंवा Boeing ची प्रवासी विमानं सरासरी २५० टनांची असतात. आपण सरासरी भारतीय हवाई क्षेत्रं २५०० किमी चे धरू. एका उड्डाणाचे साधारण ५०,००० होतात. परतीच्या उड्डाणाचे अजून ५०,०००. साधारण १ लाख रुपये - केवळ एका विमानाच्या उड्डाणाचे!! विमानप्रवास बंद झाला तर हा महसूल पूर्ण बंद होईल.....थोडक्यात काय, संपूर्ण अर्थव्यवस्था दहा पावलं मागे जाईल असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये.
आजकाल आपले बरेच नातेवाईक आणि मित्रमंडळी अमेरिका, लंडन, जर्मनी अशा देशांमध्ये असतात. विमान प्रवास बंद झाला तर त्यांच्या फक्त "virtual भेटीवरच " समाधान मानावे लागेल. वयोवृद्ध पालक अक्षरशः झुरतील मुलांच्या भेटीकरता!! पालक हल्ली मुलांना प्रगत देशांमध्ये शिक्षण देण्याची स्वप्नं पाहतात आणि पूर्ण सुद्धा करू शकतात..... ती सगळी स्वप्नं भंगून जातील! आपल्याकडच्या आरक्षण, राजकारण, फसवेगिरी अशा सगळ्या गोष्टींनी भरलेल्या "Business of Education" मध्येच पालकांना कुठेतरी सुवर्णमध्य शोधावा लागेल. आपल्याकडचे "Student Exchange" प्रोग्रॅम्स बंद पडतील.
मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रावरही दूरगामी प्रभाव पडेल. चोप्रा कंपनीला परदेशी जाऊन शुटिंग्स करता येणार नाहीत! कदाचित दर्जेदार low budget फिल्म्स आपल्याला पाहायला मिळतील. कलाकारांचे "live कार्यक्रम ", नाटकांचे परदेश दौरे मात्र होऊ शकणार नाहीत. कलाकार मंडळींची "Destination Weddings" पण देशातल्या देशातच करावी लागतील की बिचाऱ्यांना ..... क्रीडा क्षेत्राचं म्हणाल तर विम्बल्डन, वर्ल्ड कप, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा , ऑलिम्पिक अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या खेळाडूंना भाग घेता येणार नाही. विमान प्रवास नसेल तर कदाचित अशा स्पर्धांचं आयोजनच केलं जाणार नाही! आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण तर फार लांबची गोष्ट वाटू लागेल. बाहेरची स्पर्धा किंवा तुलना नसल्याने आपल्या खेळाडूंचा स्तर खालावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकच सकारात्मक गोष्ट मला यातून दिसत्ये ती म्हणजे हवाई अपघात आणि अपहरण प्रकरणे थांबतील. परंतु तुलना करता ती खरंच इतकी आहेत का? कदाचित नाही.
विमान प्रवास बंद झाला तर साधारणपणे नकारात्मक परिणामच अधिक होतील असे वाटतंय. परंतु जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा माणूस बाकीचे दरवाजे ठोठावण्याचा प्रयत्न नक्कीच करतो आणि तसा आपणही सर्वजण तो करू. त्यातूनच कदाचित काही बाबतीत आपण अधिक चांगले पर्याय शोधून काढू. उदाहरणार्थ , शिक्षणाचा दर्जा कायम ठेऊन actual classroom आपण virtual classroom मध्ये रूपांतरित करू शकतो . Live concerts चं परिवर्तन E - concerts मध्ये करता येईल. पण ही एक शक्यता आहे केवळ!
म्हणूनच म्हणते तात्पुरता विमान प्रवास बंद झाला तर चालेल एकवेळ, पण कायमचा? नक्को रे बाबा!